दत्तात्रय जोशी
श्रीसागर,
इमारत ७/४, योजना क्र.१०, पेठ २१,
यमुना
नगर, निगडी, पुणे - ४११०४४.
भ्रमणध्वनी
: ९२७०२२३४४०
|
|
प्रत्येकाला कशाचे तरी वेड असते तसे याना नोकरीत
असल्यापासूनच इतरांना वेगवेगळ्या सहलीसाठी ..... घरातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना
खरे तर सहलीतून इतरांना आनंद मिळावा अशी त्यांची प्रेमळ इच्छा. माझ्या कार्यालयाशेजारी
सारथी टुरिझम चे कार्यालय आहे .... ते माझे चांगले मित्रच आहेत .... श्री ज्ञानेश्वर
धस ... टाटा मोटर्स येथून सेवानिवृत्त झालेले. त्यांच्या इच्छेमुळे मी खरे तर पूर्वी
३ सहली सारथी टुरिझम द्वारे पूर्ण केल्या आहेत. पण ही चौथी चारधाम एक अनोखी आणि अविस्मरणीय
अशी यात्रा/सहल दि. २५-९-२०१८ ते ९-११-२०१८. याकाळातील प्रवास वर्णन आणि माहिती देण्याचा
हा थोडासा प्रयत्न करत आहे.
बऱ्याच वर्षांपासून त्यांनी मला माझ्या कार्यालयात
येऊन ..... " तुम्हाला एकदा चारधाम यात्रेला घेऊन जाण्याची माझी फार इच्छा आहे
" असे खूप वेळा येऊन सांगितले होते. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. कारण त्यावेळी
जाण्यासाठी अनुकूलता नव्हती. मे २०१८ मध्ये त्यांनी मला विचारून माझे नाव चारधाम यात्रेत
नोंद केले. आणि जाण्याचा दिवस उद्यावर येऊन
ठेपला. कामाची घाई .... कपडे, आणि अनेक लागणाऱ्या अनंत वस्तूंनी ... सुटकेस भरून घेतल्या.
शेवटी दुरांतो पुणे हज. निज. एक्सप्रेस गाडीने निघालो.
थोडी माहिती काढली असता असे लक्षात आले की, हिमालयीन
चारधाम यात्रा संपूर्णपणे उत्तराखंड राज्यात आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती ०९ नोव्हेंबर
२००० रोजी करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्याचे १३ जिल्हे वेगळे करून उत्तराखंड हे भारताचे
१७ वे राज्य निर्माण करण्यात आले. उत्तराखंड राज्याचे सुरूवातीचे नाव उत्तरांचल असे
होते. नंतर ते बदलुन उत्तराखंड करण्यात आले. हिमालयातील चारधाम यात्रेत यमुनोत्री,
गंगोत्री, केदारनाथ व बदरीनाथ. या चार तिर्थक्षेत्राचा समावेश आहे. या तिर्थक्षेत्राच्या
वाटेवरच आणखी असंख्य मंदीरे व देवालये आहेत. हिंदूंच्या असंख्य देवतांचे वास्तव्य या
प्रदेशात झालेले आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकात आदि शंकराचार्यानी ही तिर्थयात्रा करून
अनेक मंदीरे व मठ बांधले आहेत.
उत्तराखंड आणि हिमालयाचे क्षेत्र म्हणजे भारताचा
मुकूटमणी, प्राकृतिक सौंदर्य, अलौकिक निसर्गरम्य दृश्य, देवांची तपोभूमि आणि तीर्थांचे
भांडार असणारा हा भाग. पुराणातील कथेनुसार गंगादेवी ने पृथ्वीवर येऊन पापमुक्त करण्यासाठी
नदीच्या रूपात पृथ्वीला कृतार्थ केले होते. केदारखंड मध्ये गंगेची अनेक रूपे आणि नावे
आहेत. जसे की, गंगोत्री मध्ये भागीरथी, केदारनाथ मध्ये मंदाकिनी आणि बद्रीनाथ मध्ये
अलकनंदा. या पावन संगमामुळे देशातील श्रध्दाळुंची आस्था आणि विश्वासाचे प्रतिक आहे.
परंपरेनुसार चारधामची यात्रा पश्चिम ते पूर्व अशी होते. यमुनोत्री ला सुरूवात होवुन
गंगोत्री, केदारनाथ नंतर बद्रीनाथ ला येथे ही यात्रा संपन्न होते. यमुनोत्री आणि केदारनाथ
ला पायी चालावे लागते परंतू उर्वरित गंगोत्री आणि बद्रीनाथ धाम डांबरी रस्त्यालगत वाहनाव्दारे जोडले गेलेले आहे. या चारधाम यात्रेचा
आरंभ हरिव्दारपासूनच सुरू होतो.
हज. निजा. येथे सकाळी ७ वा. पोचली. नंतर ३० आसनाची
वातानुकुलीत गाडीने हरिव्दार येथे पोचलो. नंतर एका अद्ययावत अशा लॉजमध्ये उतरून सर्व
साहित्य ठेवुन आंघोळ करून संध्याकाळी ७ च्या दरम्यान गंगाघाटाजवळ "हर की पौडी'
येथे उतरून गंगा किनारी जाऊन आरतीमध्ये सामील झालो. साधारण थंडी होती पण गंगेच्या पाण्यात
हात घातला तर ते पाणी अतिशय थंड म्हणजेच हिमालयातून आलेले होते. संध्याकाळी गंगेची
आरती असते. आरती झाल्यानंतर असे कळाले की या आरतीची वेळ सूर्यास्ताच्या वेळेनुसार बदलत
राहते. हरिव्दारच्या गंगेच्या उजव्या किनार्यावर असलेले सुंदर ठिकाण आहे. जिथे गंगाने
शिवालिक पर्वतांचे खोदकाम करून मैदानात प्रवेश करण्यासाठी प्रवेशव्दार तयार केले होते.
येथे हिमालयातील थंड अमृतमयी प्रवाहित होतो. या गंगेने कपिल मुनिच्या शापाने भस्म झालेले
सगर महाराज यांच्या साठ हजार सैनिकांना मोक्ष दिला होता. म्हणूनच येथे भारत देशातील
अधिकाधिक अस्थि विसर्जन गंगेच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात. येथे दर बारा वर्षानी
महाकुंभ मेळा आणि सहा वर्षानी अर्धकुंभ मेळयाचे मोठया
प्रमाणात आयोजन केले जाते. गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रा मार्ग येथुनच सुरू होतो.
" हर की पौडी '' या स्नान घाटावर स्नान केल्यावर भक्तांना मुक्ती मिळते असे
मानले जाते. हर की पौडी च्या दक्षिणेला कुशावर्तघाट पितृकर्म तर्पणादिसाठी बनविला आहे.
मनसा देवीचे मंदिर जे विल्लव पर्वतावर आहे. गोरखनाथाची गुफा विल्वकेश्वर मंदर, श्री.
अयप्पा मंदीर, कालभैरव मंदीर, गीताभवन, मायादेवी मंदीर, गुरूकुल कांगडी विश्वविद्यालय
कनखल, सप्तषि आश्रम आणि भीमगोडा तलाव अशी प्रेक्षणिय स्थळे आहेत.
सकाळी तयार होवुन यमुनोत्री कडे निघालो, कांही
अंतरावर गेल्यावर डेहराडून हे शहर लागले. हिमालयाच्या शिवालिक पर्वत रांगात आणि निसर्ग
सौंदर्याच्या कुशीत वसलेले हे शहर आहे. जगप्रसिध्द डुन स्कूल ही शाळा तसेच राष्ट्रीय
संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या दोनच शाखा आहेत. पहिली डेहराडून आणि दुसरी खडकवासला,
पुणे येथे आहेत. पुरातन काळात पांडव व कौरवांचे गुरू द्रोणाचार्यांचे वास्तव्य या शहरात
होते. पुन्हा कांही अंतरावर गेल्यावर मसूरी हे उत्तराखंडातील दुसरे अतिशय निसर्गरम्य
व थंड हवेचे ठिकाण असलेले शहर लागले. मसुरीमधून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांचे
नयनरम्य व मनोहारी दृश्य दिसत होते. जाताना लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय प्रबोधिनी
ही संस्था लांबुनच पाहिली. या संस्थेत जिल्हाधिकारी व वरीष्ठ पोलिस अधिकार्यांना प्रशिक्षण
देणारी एकमेव संस्था आहे.दिवसभर प्रवास केला तो म्हणजे २४२ कि.मी. यमुनोत्रीसाठी जाताना
बारकोट येथे लॉजमध्ये मुक्काम केला. पाहिले तर आजुबाजुला पर्वतांच्या रांगा आणि सूचीपर्णी
वृक्षाने नटलेली हिरवाई मन आकर्षित करत होती. जाताना बसमध्ये सकाळी प्रथम सर्व देवीदेवतांच्या
ठराविक आरत्या, स्तोत्र इ. नियमित कार्यक्रम असायचा. गाडीमध्ये लहान ध्वनीक्षेपकाची
सोय देखील होती. जाताना एका बाजूस भिती वाटतील असे अजस्त्र डोंगर, समोर पर्वतांची रांग
त्यावर सूर्यकिरणे पडलेली, थोडी बोचरी थंडी त्या दूरवर दिसणार्या पर्वतावर हिमकण आच्छादलेले
होते. त्याकडे बघुन असे वाटे की, कांही पर्वतावर पांढराशुभ्र बर्फ सोनेरी प्रकाश पडल्यामुळे
सोन्याची चादर ओढून बसले आहेत असे वाटले आणि त्या सकाळच्या कोवळया उन्हामुळे अतिशय
लक्ष् वेधून घेत होता. जाताना असे लक्षात आले की, रस्ते डांबरी आहेत पण १० फुटाचा अरूंद
असा होता. कधी डाव्या बाजूस तर कधी उजव्या बाजूस हजारो फुट खोल अशा दर्या आणि हजारो
फूट उंच असे भिति वाटतील असे एका पाठोपाठ अशी डोंगराची न संपणारी रांग. त्यातूनच जाणारा
हा एकमेव असा अरूंद रस्ता त्यामुळे समोरून कधी गाडी आली तर थांबणे क्रमप्राप्त असायचे
असा तो रस्ता. दुसर्या दिवशी सकाळी नंतर आमची बस जानकीचट्टी येथे पोचली. येथे पायी,
घोडा किंवा डोली या साधनानी यमुनोत्री मंदीरापर्यंत जाता येते परंतू आम्ही चालत जाण्याचे
ठरवले. यमुनोत्री येथे यमुनादेवीचे मंदीर आहे. ते मंदीर टेहरी गढवालचा राजा प्रतापशाह
यांनी बांधले आहे. मंदीराच्या जवळच गरम पाण्याचे कुंड असुन त्याला सूर्यकुंड म्हणतात.
आम्ही पण या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून दर्शन घेतले ६ कि.मी. चढून आल्यानंतर
गरम कुंडात स्नान केल्यामुळे खुपच छान वाटले. येथे स्त्री आणि पुरूषांसाठी स्नानाची
स्वतंत्र सोय आहे. ही यमुनानदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातून
वाहत जाऊन अलाहाबाद येथे गंगा नदीला मिळते. यमुनोत्रीची उंची समुद्रसपाटीपासून १०,६००
फूट आहे.
उत्तर काशीचा मुक्काम आटोपून सकाळी निघालो ते
म्हणजे गंगोत्री कडे सुमारे २३० कि.मी. च्या प्रवासासाठी. उत्तराखंडातील हिमालयीन पर्वतराजीने
नटलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत गंगोत्रीला पोचलो. गंगोत्री येथे गंगानदीचे
मंदीर आहे. गंगेला उगमापासुन देवप्रयाग पर्यंत भागिरथी म्हणतात. पुराणातील कथेनुसार,
भगिरथराजाने अपार कष्ट व तपश्चर्या करून गंगानदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली आहे. अनेक
वर्षे तपस्या केल्यानंतर या गंगा देवीने भगीरथाची इच्छा पूर्ण केली होती. तेव्हापासून
"भगिरथ प्रयत्न'' ही म्हण तेव्हापासून पडली असावी. पुराणशास्त्रानुसार शंकराने
गंगा देवीच्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी या नदीला आपल्या जटेमध्ये धारण केले होते.
गंगोत्री मंदीरापासुन १९ किमी अंतरावर वरच्या बाजूस गोमुख असुन गंगा नदीचा उगम तेथुनच
होतो. गंगोत्रीचे मंदीर व सर्व परिसर ६ महिने बर्फाच्छादित असतो. त्यावेळी तेथील मंदीर
व सर्व व्यवसाय बंद असतात असे समजले. गंगोत्रीचे हे मंदीर गुरखा जनरल अमरसिंह थापा
याने अठराव्या शतकात बांधले आहे. गंगा मंदिराच्या जवळ या स्थानाचे रक्षण करणारी देवता
म्हणजे भैरव... यांचे देखिल एक लहान मंदिर आहे. गंगा मंदिरामध्ये गंगा, भागीरथी आणि
अन्य देवतांच्या मूर्ति आहेत. गंगा मंदीर मे महिन्यापासुन ऑक्टोबर पर्यंतच उघडे असते.
दीपावली नंतर गोवर्धन पूजा असते त्यानंतर मंदिर बंद केले जाते. थंडीच्या दिवसात श्री
गंगेची पूजा मुखवा धाम मध्ये केली जाते. ही गंगा नदी पुढे उत्तराखंड - उत्तरप्रदेश
- बिहार व पश्चिम बंगाल राज्यातून वाहत जाऊन गंगासागर जवळ बंगालच्या उपसागराला मिळते.
रात्रीचा मुक्काम उरकुन सकाळी गंगानदीवरील टेहरी
गढवाल धरण पाहिले. येथे ४ विद्युत प्रकल्प कार्यान्वीत आहेत. नंतर मुक्कामासाठी रूद्रप्रयाग
येथे गेलो. गुप्तकाशी मार्गै केदारनाथला जाताना पायथ्याशी "फाटा' नांवाचे गाव
आहे.
वाटेत
गुप्तकाशी येथील महादेव मंदीर आणि त्रिजुगी नारायण हे अति प्राचिन मंदीर आहे. तेथे पोचलो तर तेथे बराच मोठा
पाऊस सुरू झाला. दर्शन घेऊन गुप्तकाशी येथील महादेव मंदीर व त्रिजुगी नारायण येथील
शिवपार्वती यांच्या विवाहस्थळास भेट दिली. तेथे गुरुजींकडून शिवपार्वती विवाहाची माहिती
ऐकली. मंदीराबाहेर एक धार्मिक पुस्तकाचे दुकान
होते. फक्त १२ वर्षाचा मुलगा ते दुकान चालवत होता. त्याची पुस्तके नीट व्यवस्थीत लावुन
दिली आणि एका बाईंना पुस्तक हिंदीत बोलून खपवले देखील. मग मी हसत हसत ते पैसे त्या
लहान मुलाकडे दिले तर तो खूपच खुश झाला. पाऊस चालू होता म्हटलं थोडं ईतरासाठी काम करू
या. नाहीतरी पाऊस थांबतच नव्हता. पाऊस थोडा कमी झाला आणी आम्ही परत हॉटेलसाठी निघालो.
पाऊस पडलेला होता. घाटवाटा डांबरी रस्ता परंतू खूपच अरूंद रस्ते सर्वच चारधाम मध्ये
पहायला मिळतात. एखादी गाडी समोरून येत असेल तर थांबणे अथवा थांबवणे क्रमप्राप्त होते.
बस मधून खाली पाहिले तर हजारो फूट खोल दरी आणि वर पाहिले तर हजारो फूट उंचच उंच डोंगर
सूचिपर्णी वृक्ष अगदी उंचच जसे की, कुणीतरी अगदी त्या झाडांना अगदी ९० अंशांच्या कोनात
वाढवले आहे. शेत असणारी जमिन तर मूळीच पाहायला देखील मिळाली नाही.
शेतीचे क्षेत्र अत्यंत कमी होती बाहेर मस्त उन
पडलेलं होतं. आणि कांही पिके घेतल्याचा लक्षात आलं. ती पिके काढून वाळायला ठेवली होती. नंतर लक्षात
की अरे ही तर वरई आहे. पण शेतीपासून मिळणार उत्पन्न् फार मिळत असेल असे वाटत नाही. शेती नसल्यामुळे अगदी
नगण्यच असणार. येथील लोकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे पर्यंटकांवर अवलंबुन आहेत.
नंतर केदारनाथसाठी ग्रुपमधील बर्याच पर्यटकाकडे
हेलिकॉप्टरची तिकीटे होती पण आम्ही मात्र निसर्गसौंदर्याचा आनंद घेत घेत घोडयावर जाण्याचा
निर्णय रात्रीच घेतला होता.
सकाळी ६ हॉटेलवरून निघालो सोबत जिप होतीच. त्या जिपला वाटेतच एका साधु महाराजांनी थांबण्यासाठी
विनंती केली. आणि ते साधू पुरूष आणि आणखी एक व्यक्ती कसेबसे दाटीवाटीने बसेलो आणि
केदारनाथच्या पायथ्याच्या गांवी सोनप्रयाग येथे उतरलो आणि त्या साधु महाराजांनी ४ घोडे
ठरवुन दिले. जाताना मी सौ आणि आणखी ग्रुपमधील
आणखी ७५ वयाचे २ व्यक्ती असे आम्ही ४ घोडेस्वार निघालो. डाव्या बाजूस मोठमोठ न संपणारे
डोंगर आणि उजव्याबाजूस खोलच दरी आणि त्यात गंमत म्हणजे घोडा अगदी काठावरून चालायचा
आणि घाबरगुंडी उडायची. बाजूस प्रचंड खोल दरी आणि दूधाचा प्रवाह असावा असे पांढरेशुभ्र
धबधबे. कधीही न पाहिलेली झाडे आणि अजस्त्र अशी अंगावर येतील की काय अशी डोंगरांची रांगच
रांग. सगळीकडे हिरवाईने नटलेले डोंगर पाहून प्रसन्नता देखील वाटायची पण ज्या डोंगराजवळून
जात असू तेथे मात्र भिती वाटायची. किती निसर्गाने
भरभरून दान मानसाला दिलं आहे.
केदारनाथला जाताना घोडयावरून मज्जा आली. अरूंद
रस्ते पण हिरवाईने नटलेले वैभव पाहिलं की सर्व शरीर कसं आनंदान ते स्वर्गसुख पाहून
प्रफुललीत व्हायच ते मन आणि देह. ते सौंदर्य याची देहा याची डोळा पाहिलं आणि मन तृप्त
झालं.
बर्याच ठिकाणी खडक असणारा सरळ रस्ता मध्येच एखादा
उंच डोंगरावरून खाली पडणारी गार पाण्याची धार अंगावर पडली की ते पाणी इतकं थंड असायचं
की विचारूच नका .... बर्याच प्रवासानंतर केदारनाथ दिसायला लागले .... केदारनाथच्या
मागील बाजूस पांढरे शुभ्र हिमकणांनी आच्छादलेले डोंगर आणि त्यावर पडलेले उन म्हणे असं
वाटायचा जस कांही सोन्या डोंगर आहे की काय ?
जस जसे केदारनाथचे मंदीर जवळ येत होते तसतसा गारवा वाढत होता. घोडा हाकणारी
मुले अगदीच २० च्या आतली होती. जवळ आले म्हणून थांबलो असता त्या मुलांनी पटकन खिशातून
बिडी काढली आणि ताबडतोब पेटवुन ओढण्यास सुरूवात केली. मी नेहमीप्रमाणेच त्यांना ध्रुम्रपानाचे दुष्परिणाम
हिंदीतून समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो कांही आवडला नाही. घोडयांना
चालवणारी दोन मुले नेपाळी होती. ते आपसात नेपाळी भाषेमधून बोलत होती. माझा घोडा हाकणारा
मुलगा अवघा १७ वर्षाचा होता. पण गंमत म्हणजे तो घोडयाला अधून मधून हिंदीतून शिव्या
घालत असे आणि म्हणत असे मादरचोद चल जल्दी जल्दी .... शेवटी मी त्याला हसून विचारले
" अरे इसको नेपाली क्यो नही सिखाया ' तर तो फकत मोठमोठयाने खळखळून हसायचा. आणि
पुन्हा हिंदीतच 'मादरचोद' अशा घोडयाला शिव्या घालत रस्ता पार करून देत होता. केदारनाथ जवळ आले आणि एवढी थंडी वाजायला सुरू झाली
मग आम्ही थोडे थांबुन थंडीपासून संरक्षण होण्यासाठी गरम कपडे घातले कारण बारीक किसलेला
बर्फाचा पाऊस सुरू झाला. सुरक्षिततेचे सर्व साहित्य होते. पण आपण वाटेत कोठेच आडोश्याला
थांबू शकत नाही. कारण त्यांचे पत्रा शेड थांबे आहेत. पण खूप लांब अंतरावर ते आहेत,
त्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. केदारनाथ मंदीर जवळ आले तरी आम्ही थंडी-पावसाच्या
पोशाखातच होतो आणि त्या पोशाखातच दर्शन घेतले. जाताना आम्हाला हेलीपॅड दिसत होते. तेथे
हेलीकॉप्टरची सारखी ये-जा दिसत होती. तिथे जवळच खोल डोंगर दरी आणि भूसख्खलन झालेला
खूप मोठा भाग दिसला आणि खूप वाईट वाटलं ३ वर्षापूर्वी येथे हजारो माणसं मृत्यूच्या
खाईत लोटली गेली होती त्या आठवणीने अंगावर शहारा आला.
केदारनाथच्या जवळ गेलो की घोडयावरून खाली उतरलो
आणि ५०० मिटर अंतरावर मंदीर होते. नवल म्हणजे लगेच छान उन पडलं. पाऊस पण थांबला एकदम
छान वातावरणात केदारनाथच दर्शन झालं. एका साधूच्या शेजारी उभा राहून फोटो काढला. कसले
तरी भस्म अथवा राख फासुन तो थंडीपासून संरक्षण करत होता.
केदारनाथ बारा ज्योर्तिलिगामधील एक तीर्थक्षेत्र
आहे. पांढर्या शुभ्र बर्फाच्या डोंगराच्या खाली केदारनाथचे भव्य मंदीर आहे. मंदिराच्या
शिवलिंगाचा शिव पुराणामध्ये उल्लेख आहे कि, महाभारतामधील युध्द समाप्तीनंतर भगवान वेदव्यासानी
पांडवाना केदारनाथ मध्ये जाऊन दर्शन घ्या अशी आज्ञा केली होती, कारण पांडवांना गोत्र
हत्या आणि ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळेल. जेंव्हा पांडवांचा परिवार केदारधाम
मध्ये पोचला तेव्हा भगवान शंकराने त्यांना गोत्र हत्येचे पातक असणारे लोक म्हणून शंकराने
रेडयाचे रूपामध्ये भूमिगत होत असतानाच भीमाने रेडारूपी शंकरास खूप महत्प्रयासाने पकडले.
पांडवांची श्रध्दा आणि भक्तीभावामुळे शंकराने त्यांना दर्शन दिले. भीमाने शंकरास पकडण्याच्या
जागेवर शंकरानेच आदेश दिला आणि शंकरभगवान गुप्त झाले. आणि जिथे भीमाने पकडले होते ती
जागा एक शिलारूपात बनलेली आहे. ज्याची पूजा अर्चा परंपरागत स्वरूपात प्राचीन काळापासून
होते आहे. असे बोलले जाते कि, भगवान शंकराचा महिषाचा आकार अग्रभाग जो पृथ्वीमध्ये गेलेला
होता तो भाग शरीरापासून वेगळा होवुन नेपाळ देशामध्ये प्रकट झाला आणि तो तेथे पशुपतिनाथ्
या नावाने प्रसिध्द आहे. केदारनाथ मंदीरपासुन कांही अंतरावर मंदाकिनी नदीशिवाय क्षीर
गंगा, मधुगंगा आणि सरस्वती इ. नद्यांचा संगम मानला जातो. केदारनाथ मंदिराच्या मागील बाजूस शिखरावर एक लांब
मोठा जलस्त्रोत आहे त्याला स्वर्गारोहिणी असे म्हटले जाते. येथुन पांडव स्वर्गाला गेले
होते अशी आख्यायिका आहे. केदारनाथ मध्ये आदि गुरू शंकराचार्यांची मूर्ती स्थापित केलेली
आहे. वैष्णव भक्तीची ज्ञानधारा आणि वेदांचा प्रचार आणि प्रसार करीत असताना आदि गुरू
शंकराचार्यांनी येथेच समाधी घेतली.
केदारनाथचे छान दर्शन झाले नंतर हॉटेलवर येऊन
मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता बदरीनाथच्या दर्शनासाठी निघालो मंदीराजवळ
पोचलो. उतरल्यानंतर एवढी प्रचंड थंडी होती की बस विचारूच नका. गंमत म्हणून मी जाहीर
केलं की माझ्यातर्फे सर्वांना आईस्क्रीम मोफत. सर्वांनी हसण्याचा प्रयत्न केला आणि
दातांचा थंडीमुळे कड कड असा आवाज करत नकार दिला. दर्शनाच्या बारीमध्ये उभा राहून मग
विष्णु सहस्त्र नाम आम्ही ६ जणांनी म्हटले. आणि बारीचा कसा वेळ गेला कांही कळाले नाही.
नंतर गाभार्यात आलो.
नर नारायण म्हणजेच भगवान विष्णुंचे पुण्यधाम म्हणजेच
बदरीनाथ, बदरीनारायण, बदरीकाश्रम या नावाने प्रसिध्द आहे. असं म्हणतात कि नर आणि नारायण
यांनी बदरीवनात तपस्या केली होती म्हणून येथे बदरीनारायण यांचे मंदिर आहे. ज्यामध्ये
भगवान विष्णुंचे पंचायतन मुर्ति विराजमान आहेत. श्री बदरीनाथांची मूर्ति शाळीग्राम
शिळेमध्ये ध्यानमग्न चतुर्भुज मूर्ति आहे. असे म्हणतात की, येथे प्रथम येथे देवांनी
नारदकुंडामधुन मूर्ति काढून स्थापना केली आहे. नारदांनी या मुर्तीची प्रथम अर्चना केली.
त्यानंतर बौध्दांचा प्रभाव झाला, तेव्हा या मंदिरावर त्यांना अधिकार झाला. त्यांनी
बदरीनाथांची मूर्तिला बुध्द मानून पूजा करणे चालूच ठेवले. जेंव्हा शंकराचार्य यांनी
बौध्दांना या ठिकाणाहून बाहेर काढले तेंव्हा ते तिबेट येथे पळून गेले. आणि ती मूर्ति
अलकनंदा नदीमध्ये फेकून दिली. शंकराचार्यांनी मूर्तिविना मंदिर पाहिले तेंव्हा त्यांनी
ध्यान करून आपल्या योगबळावर मूर्तिची स्थिती पाहिली आणि अलकनंदा नदीतून ती मूर्ति काढून
मंदिरात पूर्नस्थापित केली. नंतर कालांतराने मंदिरातील पुजार्यांनीच ही मूर्ति तप्तकुण्डात
फेकून दिली. आणि तेथ्न तो निघून गेला. कारण तेथे त्यावेळी यात्रेकरू तेथे न आल्यामुळे
त्या पुजार्यास जेवणापुरते सुध्दा उत्पन्न मिळत नसे. त्यावेळी पांडुकेश्वर मध्ये कोणास
तरी घंटा बसविण्याचे मनात आले तेव्हा त्याने सांगितले की भगवानचा श्री विग्रह तप्तकुंडामध्ये
पडलेले आहे. यावेळी मूर्ति तप्तकुंडातुन काढुन श्री रामानुजाचार्य यांचे हस्ते प्रतिष्ठापना
करण्यात आली. श्री बदरीनाथजींच्या उजव्या हाताला अष्टधातुची कुबेराची मुर्ति आहे. त्यासमोर
उध्दव आहेत तसेच बदरीनाथाची उत्सव मूर्ति आहे. हि उत्सव मूर्ति थंडीच्या दिवसात जोशीमठ
या गावात असते. उध्दवाच्या जवळ पादुका आहेत. डाव्या बाजूस नर नारायणाची मूर्ति आहे.
जवळच श्रीदेवी आणि भूदेवी आहे. मुख्य मंदिराच्या प्रांगणात शंकराचार्यांची गादी आणि
मंदिर समितीचे कार्यालय आहे. दर्शन झाले मस्त उन पडलेलं होतं. तिथे मंडपात बसून पुन्हा
एकदा विष्णूसहस्त्र नाम म्हटलं. आणि बाहेर पडल्यावर असे लक्षात आले की आणखी एकदा दर्शन
आपण सहज घेऊ शकतो. नंतर पुन्हा दर्शन घेतलं. बदरीनाथ मंदीराजवळून वाहणार निळंशार पाणी
आणि गरम पाण्याचे कुंड मन आकर्षुन घेत होतं.
बदरीनाथ मंदिराच्या खाली तप्तकुंड आहे. गरमकुंडाच्या
खाली पंचशिला आहे. गरूड शिळा, ही शिळा जि बदरीनाथ मंदिराला अलकनंदा नदिपासून रक्षणाथ्र्
उभी आहे आणि त्याखाली गरमपाण्याचे कुंड आहे. अलकनंदा मध्ये नारद कुंड आहे या ठिकाणी
नारदांनी बरीच वर्षे तप केले होते. कांही अंतरावर अलकनंदेच्या किनारी एक शिळा, त्याला
ब्रम्हकपाल तीर्थ म्हणतात. येथे यात्रेकरू पिंडदान इ. करतात. त्याखाली ब्रम्हकुंड आहे
येथे ब्रम्हा ने तप केले होते.
नंतर मग मानागाव, सरस्वती नदीचा उगम गणेश गुफा
/ व्यास गुफा बघण्याचा विचार होता पण तिथे रस्ता रूंदीकरण्याचे काम चालू असल्यामुळे
मोठी बस त्यांनी सोडलीच नाही. नंतर मग तिथेच एका आश्रमात जेवण केलं. हात धुण्याचा प्रयत्न
केला तर प्रश्चातापच होईल एवढ गार पाणी नळाला होतं पण पर्याय नव्हता कसंतरी जेवण करून
लगेच गाडीत बसलो कारण थंडीच नकोशी करत होती. अजून जवळ तेथे २८ किमी अंतरावर पांडुकेश्वर
आणि फूलों की घाटी ४२ किमी अंतरावर बघण्यासारखी ठिकाणे आहेत.
नंतर पुन्हा हरिव्दारला पोचलो. तिथे हरकी पौडी
येथे गंगा नदीची आरती केली. मनसा देवीचे दर्शन घेतले नंतर मस्तपैकी आक्रोड खरेदी केले.
सर्व मार्केट पाहिले. आणखी इतर खरेदी केली.
हरिव्दार पासून चारधाम यात्रेसाठी २६ आसनक्षमतेची
गाडी होती. ही गाडी चालवणारा श्री. भंडारी चालक. या सर्व घाटामध्ये आणि इतर ठिकाणी
गाडी खूप छान चालवली. बर्याच ठिकाणी असे जाणवले की खरच हा चालक म्हणजे देवमाणूस असल्याशिवाय
असा चांगला प्रवास होवुच शकत नाही. या चारधाम
यात्रेस जाण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे हे मात्र आवर्जून
सांगावेसे वाटते.
हिमालयीन चारधाम यात्रेतील क्षणचित्रे
...... गंगोत्री
हिमालयीन चारधाम यात्रेतील क्षणचित्रे
...... यमुनोत्री
हिमालयीन चारधाम यात्रेतील
क्षणचित्रे ...... केदारनाथ
हिमालयीन चारधाम यात्रेतील
क्षणचित्रे ...... ऋषिकेश
जय हो बद्री विशाल ..... यात्रा संपन्न ||




